नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- फुड कॅफेमध्ये काम करणा-या नोकराने गल्यातील रोकडसह मोबाईलवर डल्ला मारल्याचा प्रकार अशोका मार्ग भागात घडला. या घटनेत सुमारे १२ हजार रूपये किमतीच्या ऐवज भामट्याने पळविला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विराज प्रधान (रा.पंचवटी कारंजा) असे संशयित नोकराचे नाव आहे. याबाबत विवेक राजाराम काळे (रा.आनंदवली,गंगापूररोड) यांनी फिर्याद दिली आहे.
काळे यांचा अशोका मार्ग येथे पॉकेट नावाचा कॅफे असून यात संशयित कामास होता. बुधवारी (दि.२०) दुपारच्या सुमारास संशयिताने ही चोरी केली. कॅफेतील गर्दीची संधी साधत संशयिताने काऊंटरवर ठेवलेल्या मोबाईलसह गल्यातील सुमारे दोन हजार रूपयांची रोकड असा १२ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास पोलीस नाईक जाधव करीत आहेत.
कोयताधारीस पोलीसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– परिसरात दहशत माजविणा-या कोयताधारीस पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई अमरधाम रोडवरील शितळा देवी मंदिर परिसरात करण्यात आली. संशयिताच्या ताब्यातून धारदार लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उद्देश उर्फ मुन्ना कैलास कुंभकर्ण (२३ रा. कुंभारवाडा काझीगडी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित कोयताधारीचे नाव आहे. शितळा देवी मंदिर भागात एक तरूण कोयत्याचा धाक दाखवत दहशत माजवित असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी (दि.२१) सायंकाळी पथकाने धाव घेत संशयिताच्या मुसक्या आवळल्या. हातातील कोयत्याचा धाक दाखवत तो मी या एरियाचा दादा आहे कोणामध्ये दम असेल तर या समोर असे म्हणून आरडाओर करीत होता. संशयिताच्या ताब्यातून लोखंडी कोयता जप्त करण्यात आला असून अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत.