नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागात झालेल्या तीन घरफोडीमध्ये चोरट्यानी सुमारे सव्वा सहा लाख रूपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात भरदिवसा झालेल्या एका घरफोडीसह सराफी दुकान फोडल्याचा समावेश आहे. याप्रकरणी पंचवटी व भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश किरण विसपुते (२७ रा.अमृतधाम) यांनी फिर्याद दिली आहे. विसपुते यांची अमृतधाम भागात सराफी पेढी आहे. बुधवारी (दि.२०) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एसएसडीनगर येथील येथील धनवृध्दी ज्वेलर्स दुकान व नजीकच्या श्री प्लाझा इमारतीतील नितीन विश्वनाथ आलापुरे यांच्या फ्लॅटमध्ये घरफोडी केली. दोन्ही ठिकाणाहून सुमारे २ लाख ६७ हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला असून त्यात ६० हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीच्या अलंकारांचा समावेश आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार कोरडे करीत आहेत. तिसरी घटना द्वारका भागात घडली. स्वराज ट्रॅक्टर हाऊस परिसरात गुरूवारी (दि.२१) भरदिवसा घरफोडून चोरट्यांनी सुमारे ३ लाख ६३ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी हिरालाल नंदलाल कुरील (रा.प्रगती सोसा. स्वराज ट्रॅक्टर हाऊस पाठीमागे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कुरील कुटूंबिय गुरूवारी नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले असता अज्ञात चोरट्यानी त्यांच्या बंद घराचा पाठीमागील दरवाजालगतची भिंत फोडून ही घरफोडी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी लोखंडी कपाटात ठेवलेली दहा हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ३ लाख ६३ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.