नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आडगाव शिवारात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे पावणे दोन लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात ७० हजाराच्या रोकडसह सोन्याचांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. याबाबत पोलीस दप्तरी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश रूंजाजी भालेकर (३२ रा.सरगम रो हाऊस, इच्छामणी नगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. भालेकर कुटुंबिय रविवारी (दि.१७) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली ७० हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख ७३ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार वाघ करीत आहेत.
मोबाईल दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- फोनवर बोलत रस्त्याने पायी जाणा-या युवकाच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेला. ही घटना सिडकोतील त्रिमुर्ती चौक परिसरात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अब्दूल करीम अब्दूल रहीम (२८ रा. हेडगेवारनगर दत्तमंदिर स्टॉप,सिडको) या युवकाने याबाबत फिर्याद दिली आहे. अब्दूल रहिम हा युवक सोमवारी (दि.१८) रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास हेडगेवार चौकातून दत्त मंदिर स्टॉपच्या दिशेने मोबाईलवर बोलत रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली. पाठीमागून डबलसिट दुचाकीवर प्रवास करणा-या भामट्यांनी त्याच्या हातातील सुमारे १५ हजार रूपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला. अधिक तपास हवालदार महाजन करीत आहेत.