नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कारमधून आलेल्या नागासाधूने संमोहन करीत एका व्यावसायीकाच्या खिशातील रोकडसह हातातील सोन्याची अंगठी लांबविल्याचा प्रकार जेलरोड भागात घडला. या घटनेत ५२ हजाराच्या ऐवजावर भामट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय रामचंद्र परदेशी (५५ रा.कोयना कॉलनी,एमएसईबी कॉलनी समोर,जेलरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. परदेशी यांचा लॉन्ड्रीचा व्यवसाय असून मंगळवारी (दि.१९) दुपारच्या सुमारास ते आपला व्यवसाय सांभाळत होते. दुकानासमोर येवून थांबलेल्या पांढ-या कारमधील एकाने खाली उतरून परदेशी यांना जवळ बोलावून घेत महाराज आले असून ते तुम्हाला बोलावत असल्याचे सांगितल्याने ते कारजवळ गेले असता ही घटना घडली. कारमध्ये एका नागासाधू सारख्या दिसणा-या व्यक्तीसह अन्य तीघे होते.
परदेशी कार जवळ गेले असता बाबाने काम धंद्याबाबत विचारपूस करीत आशिर्वाद लोगे या धन असे म्हटल्याने परदेशी यांनी बाबाचे दर्शन घेतले असता संशयितानी संमोहन करीत परदेशी यांच्या खिशातील १२ हजाराची रोकड व हातातील सोन्याची दहा ग्रॅम वजनाची अंगठी असा सुमारे ५२ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल काढून घेत शिवाजीनगरच्या दिशने पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक कल्पेश दाभाडे करीत आहेत.