नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ६० कोटींचे व्यावसायीक कर्ज मिळवून देण्याचा बहाणा करून ठाणे येथील दोघा भामट्यांनी शहरातील एका व्यावसायीकास साडे पाच लाख रूपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. वित्तीय संस्थाचे सॅक्शन लेटर दाखवून प्रोसेसिंग फीच्या नावाने ही रक्कम उकळण्यात आली असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इक्बाल कुरेशी (रा.मिरारोड ठाणे) व अरविंद तिवारी (रा.टेंबारोड,भायंदर जि.ठाणे) अशी संशयित ठकबाजांची नावे आहेत. याबाबत जयेश मोहन तिवारी (रा. विठ्ठल रूख्मिनी मंदिराजवळ वडाळाशिवार) यांनी फिर्याद दिली आहे. जयेश तिवारी यांचा राहत्या ठिकाणी अॅग्रीकल्चर ट्रेडर्स नावाचा व्यवसाय आहे. या व्यवसाय वृध्दीसाठी सन. २०२३ मध्ये तिवारी यांनी संशयितांची भेट घेतली असता ही फसवणुक झाली. तिवारी यांचा विश्वास संपादन करीत संशयितांनी ६० कोटी रूपयांचे व्यावसायीक कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविले.
त्यानंतर अॅक्सिस बँकेचा बनावट डीडी तसेच फुल्ट्रॉन इंडिया या वित्तीय संस्थेचे प्रि लोन सॅक्शन लेटर दाखवून भामट्यांनी बँकेच्या प्रोसेसिंग फी म्हणुन सहा लाख रूपये उकळले. दोन अडीच वर्ष उलटूनही कर्जाचा एक रूपयाही पदरात न पडल्याने तिवारी यांनी तगादा लावला असता संशयितांनी टाळाटाळ केली. त्यामुळे त्यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक दत्तात्रेय गोडे करीत आहेत.