नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्लॉट खरेदी विक्री व्यवहारात एकास लाखों रूपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. विसार पावती करूनही खरेदीखत करून न दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृष्णराव शालीग्राम निफाडकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित ठकबाजाचे नाव आहे. याबाबत सुरेंद्र नामदेव देवरे (रा. चर्चच्या मागे वडाळा पाथर्डी रोड इंदिरानगर ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. देवरे यांनी परिसरातील सर्वे न. ८८९ – ४ – १४ या भूखंडाचा व्यवहार संशयिताशी केला होता. डिसेंबर २०१५ मध्ये झालेल्या या व्यवहारापोटी १० लाख ६३ हजाराची रक्कम धनादेश आणि ऑनलाईन पध्दतीने अदा करण्यात आली होती. यापोटी संशयिताने लेखी साठेखत व विसार पावती करून दिले होते. ठरलेल्या व्यवहाराची रक्कम अदा करूनही संशयिताने मात्र व्यवहार पूर्ण केला नाही.
फसवणुक करण्याच्या उद्देशाने गेली अनेक वर्ष खरेदीखत करून दिले नाही. देवरे यांनी खरेदी खत करून दे अथवा पैसे दे असा तगादा लावला असता संशयिताने बनावट साक्षरी केलेला धनादेश दिला मात्र तोही न वटता बँकेतून परत आला. पैसे परत न करण्यासाठी वेगवेगळया कायदेशीर बाबी पुढे आणून रक्कम परत करण्यास टाळाटाळ करून फसवणुक केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पुरी करीत आहेत.