नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सातपूर कॉलनीतील सिद्धार्थ भाटे उर्फ सिद्धार्थ गुरु या भोंदू बाबावर नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. जादूटोणाविरोधी कायदा तसेच इतर आवश्यक कायद्यान्वये कडक कायदेशीर कारवाई करावी यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नाशिक व महाराष्ट्र राज्य महिला तक्रार निवारण केंद्र, नाशिक रोड शाखेतील समुपदेशन विभागाच्या कायदेशीर सल्लागार अॅड. अनिता जगताप आणि त्यांचे सहकारी यांच्या वतीने पोलीस आयुक्त नाशिक शहर यांना काल सविस्तर निवेदन देण्यात आले होते.
त्यानुसार पोलीस आयुक्त यांनी पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांना भोंदूबाबा विरोधात नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देण्यास सांगितले. म्हणून काल रात्री सदर भोंदूबाबा विरोधात अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषणासंबंधीच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. माझ्या अंगात अघोरी शक्ती असून सदर मुलीने माझ्याशी लग्न केले तर ती अघोरी शक्ती तिलाच मिळेल असा दावा भोंदू करीत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे .
त्यामुळे असा दावा करणे हा सुद्धा जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा ठरतो. म्हणून पोलिसांनी सदर भोंदूविरोधात जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम लावावे, अशी विनंती महाराष्ट्र अंनिसच्या वतीने पत्रात करण्यात आलेली आहे. या अगोदरही या भोंदूने आणि त्याच्या साथीदारांनी अनेक असहाय्य महिला व अल्पवयीन मुलींचे लैंगिक, आर्थिक शोषण केल्याची शक्यता कार्यकर्त्यांनी वर्तवली असून, त्या अंगाने पोलिसांनी सखोल चौकशी करावी तसेच पीडितांनी न घाबरता पुढे येऊन पोलिसांना सहकार्य करावे ,असे कार्यकर्त्यांनी आवाहन केलेले आहे.
पोलीस आयुक्त नाशिक शहर यांना निवेदन देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. आशा लांडगे, जिल्हा प्रधान सचिव अरुण घोडेराव, महेंद्र दातरंगे जिल्हा कायदा सल्लागार एडवोकेट सुशीलकुमार इंदवे, रंजन लोंढे , डॉ. विभावरी गोराणे तसेच राज्य महिला आयोग तक्रार निवारण केंद्राचे चंद्रमोरे, एडवोकेट प्रभाकर वायचळे, एडवोकेट प्रशांत खरे, एडवोकेट पुष्पा ढवळे आदी
पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.