नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सायबर भामट्या महिलेने शहरातील तिघांना तब्बल ४१ लाख रूपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. शेअर्स टेड्रींगमध्ये भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेने ही फसवणुक केली असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अंकीता घोष नावाच्या महिलेने गेल्या महिन्यात तक्रारदारासह अन्य दोघांशी संपर्क साधला होता. व्हॉटसअप ग्रुपमध्ये समाविष्ट करीत सदर महिलेने शेअर्स ट्रेंडिग व गुंतवणुक विषयी माहिती दिली. बनावट ट्रेडिंग अॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडून शेअर्स ट्रेडिंग व्यवसायातून भरघोस नफा मिळवून देण्याची ग्वाही देण्यात आली.
या घटनेत तीन गुंतवणुकदाराचा विश्वास संपादन करीत या महिलेने स्टॉक व आयपीओ खरेदी करण्याच्या बहाण्याने वेगवेगळया बँक खात्यात पैसे भरण्यास भाग पाडले असून, ठकबाजांनी तिघांना तब्बल ४० लाख ४३ हजार रूपयाना गंडविले आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे करीत आहेत.
तडिपारास पोलीसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– हद्दपारीची कारवाई करूनही शहरात वावरणा-या तडिपारास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. कामटवाडा येथील दहिहंडी सोहळयात संशयिताच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभव गजानन शिर्के (रा.गोपाळ कृष्ण चौक,कामटवाडे) असे अटक करण्यात आलेल्या तडिपाराचे नाव आहे. पोलीस रेकॉर्ड वरील सराईत शिर्के याच्या गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी पोलीसांनी त्याच्याविरू ध्द हद्दपारीची कारवाई केली आहे. मात्र त्याचा वावर शहरात होता. पोलीस त्याच्या मागावर असतांना तो रविवारी (दि.१७) रात्री कामटवाडा येथील दहिहंडी उत्सवात मिळून आला.