नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– दिंडोरीनाका भागात सराईताने धारदार चाकूने सहाय्यक फौसदारास भोसकल्याची घटना घडली. मात्र प्रसंगावधान राखत सदर अधिका-याने रक्तबंबाळ अवस्थेत संशयिताच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर या सराईताला पंचवटी पोलीसांच्या स्वाधिन केले आहे. या धाडसाचे सर्वच स्थरातून पोलीस अधिका-याचे कौतुक होत आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार विकी उर्फ गट्या संजय जाधव (रा.अवधूतवाडी) असे पोलीस अधिका-यावर चाकू हल्ला करणा-या संशयिताचे नाव आहे. याबाबत मध्यवर्ती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नामदेव कारभारी सोनवणे (रा.धात्रक फाटा,आडगाव शिवार) यांनी फिर्याद दिली आहे. जमादार सोनवणे शुक्रवारी (दि.४) रात्री आठ वाजेच्या सुमारास सेवा बजावून दिंडोरी रोडने आपल्या घराकडे जात असतांना ही घटना घडली. दिंडोरी नाका भागातील गीता हार्डवेअर दुकानाजवळ एक तरूण चाकूचा धाक दाखवित दहशत निर्माण करीत होता.
रेकॉर्डवरील संशयित गुन्हेगार विकी उर्फ गट्या जाधव असल्याचे लक्षात येताच त्यांनी आपल्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या कडेला लावून संशयिताच्या हातातील चाकू हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांमध्ये हातापायी झाली. या सुमारास संशयित गट्या जाधव याने जीवे मारण्याची धमकी देत सोनवणे यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. मात्र सोनवणे यांनी न जुमानता त्याच्या हातातील चाकू हिसकावण्याचा प्रयत्न सुरूच ठेवल्याने ही घटना घडली. खाकी स्टाईल मुसक्या आवळण्यात आल्याचे लक्षात येताच त्याने सोनवणे यांच्या पोटात धारदार चाकू खोपसला आणि झटका मारून पोबारा केला. मात्र जखमी सोनवणे यांनी न डगमगता व जीवाची पर्वा न करता पोटातून रक्ताच्या चिरकांड्या उडत असतांनाही त्याचा पाठलाग करून मुसक्या आवळल्या.
सिनेस्टाईल एक हात पोटावरील चाकूवर लावून धरत त्यांनी दुस-या हाताने प्रतिकार करीत गोट्या जाधव यास चितपट केले. काही नागरिकांच्या मदतीने याबाबतची माहिती पंचवटी पोलिसांना देण्यात आल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळ गाठून सशयितास ताब्यात घेतले. तसेच जखमी सोनवणे यांना उपचारार्थ हलविले. सोनवणे यांनी प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात विकी जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पडोळकर करीत आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त संदिप कर्णीक यांच्यासह वरिष्ठांनी जमादार सोनवणे यांच्या प्रकृर्तीची चौकशी करीत त्यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे.