नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वाहन बाजूला घेण्यास सांगितल्याने दोघांनी दुचाकीस्वारास बेदम मारहाण करीत लुटल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील श्रमिकनगर भागात घडली. या घटनेत दगडफेक करून दहशत माजवित दोन जणांनी दुचाकीस्वाराच्या खिशातील पंधराशे रूपये बळजबरीने काढून घेत पोबारा केला असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेम गिते (२१) व त्याचा १९ वर्षीय साथीदार अशी संशयित लुटारूंची नावे आहेत. याबाबत परशराम पाटील बोढारे (३२ रा.हिंदी शाळेजवळ,श्रमिकनगर) यांनी फिर्याद दिली आहे. बोढारे शनिवारी (दि.१६) सायंकाळच्या सुमारास मोटारसायकलला पेट्रोल भरण्यासाठी शिवाजीनगरच्या दिशेने जात होता. गणेश कॉलनी जवळील श्री कृष्ण किराणा दुकानासमोर ही लुटमार झाली. रस्त्याने जाणारा मालट्रक थांबवून संशयित रस्त्यातच चालकाशी गप्पा मारत असतांना पेट्रोल भरण्यासाठी जाणारे बोढारे यांनी संशयितांना वाहन बाजूला घेण्यास सांगितल्याने ही घटना घडली.
संतप्त दोघांनी बोढारे यांना शिवीगाळ करीत जवळच पडलेला दगड उचलून भिरकावला. या घटनेत बोढारे जखमी होताच संशयितांनी त्यांच्या खिशातील एक हजार ५०० रूपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली. यावेळी स्थानिकांनी बोढारे यांच्या मदतीला धाव घेतली असता संशयितांनी परिसरात दगडफेक करीत दहशत माजविली. यावेळी बोढारे यांच्या काका आणि काकूलाही शिवीगाळ करीत पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक न्याहळदे करीत आहेत.