नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- इन्स्टाग्राम या सोशल साईटवर स्टोरी टाकण्याच्या वादातून टोळक्याने दोन मित्रावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना मराठा हायस्कूलच्या प्रवेशद्वारावर घडली. या घटनेत अल्पवयीन मुले जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात सात जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साई कुटे,आर्यन मोगरे,प्रणव मणारे,ओम मुर्तडक,अजिंक्य वाघमारे, प्रिन्स व भावेश अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत कार्तिक सुरेश ठोंबरे (१७ रा.अनुसयानगर,आरटीओ समोर पेठरोड) या युवकाने फिर्याद दिली आहे. ठोबरे, आयुष पाटील आणि सुमित माने आदी तिघे शुक्रवारी (दि.१५) सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास मित्र ओम पवार यास पेट्रोल देण्यासाठी मराठा हायस्कुल गेट समोर गेले असता ही घटना घडली.
संशयित टोळक्याने तिघा मित्रांना गाठले. संशयित आर्यन मोगरे याने आयुष पाटील यास इन्स्टाग्राम या सोशल साईटवर टाकलेल्या स्टोअरीच्या कारणातून कुरापत काढून त्यास मारहाण केली. यावेळी आयुष पाटील हा तेथून पळून गेला असता संशयित साई कुटे याने हा पण त्यातलाच आहे असे म्हणत कार्तिक ठोंबरे याच्यावर धारदार चॉपरने सपासप वार केले. तर उर्वरीतांनी सुमित महेश माने (१७ रा.कर्णनगर,पंचवटी) यास मारहाण करून गंभीर जखमी केले. या घटनेत ठोंबरे व माने गंभीर जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ खासगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक टिपरे करीत आहेत.