नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुलीस धुळे महापालिकेत नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवून दोघांनी एका पालकास सव्वा सहा लाख रूपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. बनावट ऑर्डरचा भांडाफोड झाल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार जालिंदरनाथ अशोक मोरे (३० रा.साई सुदर्शन कॉलनी धुळे) व पुरूषोत्तम अनिल वाघ अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत निलेश नामदेव तुपलोंढे (रा.ध्रुवनगर,गगापूर शिवार) यानी याबाबत फिर्याद दिली आहे. तुपलोंढे याचे श्रमिकनगर भागात घर असून ते त्यांनी भाडेतत्वावर दिलेले आहे. गेल्या जानेवारी महिन्यात ते भाडेकरूस भेटण्यासाठी गेले असता तेथे त्यांची संशयित मोरे यांच्याशी ओळख झाली होती. यावेळी संशयिताने धुळे महापालिकेत मुलीस नोकरी लावून देण्याची ग्वाही दिल्याने ही फसवणुक झाली.
ठरल्यानुसार तुपलोंढे यांनी ६ लाख १५ हजार ७०० रूपयांची रक्कम संशयितास आरटीजीएस व फोन पे च्या माध्यमातून अदा केली आहे. यानंतर संशयिताने तुपलोंढे यांना मुलीच्या नोकरीचे नियुक्ती पत्र दिले. मनपा आयुक्तांची सही असलेले नियुक्ती पत्र घेवून तुपलोंढे बापलेकीने धुळे महापालिका गाठली असता संशयितांच्या ठकबाजीचा भांडाफोड झाला. नियुक्तीपत्र बनावट असल्याचे समोर येताच तुपलोंढे यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक महाजन करीत आहेत.