नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात अवजड वाहनांमधून डिझेल चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र आहे. सोमवारी (दि.११) पहाटेच्या सुमारास महामार्गावरील एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या आवारात उभ्या असलेल्या दोन ट्रकांमधील सुमारे ४०० लिटर डिझेल चोरट्यांनी चोरून नेले असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष कचरू भागवत (रा.कलानगर,दिंडोरीरोड) यांनी फिर्याद दिली आहे. भागवत व चंदू यादव यांचे अनुक्रमे मालट्रक एमएच ४१ जी ६४६५ व एमएच ४८ डीसी ३४२८ सोमवारी रात्री आडगाव शिवारातील राजस्थान गुजरात ट्रान्सपोर्ट येथे लावलेले असतांना ही घटना घडली. पहाटेच्या सुमारास सहा ते सात जणांच्या टोळक्याने दोन्ही मालट्रकमधील सुमारे ३६ हजार रूपये किमतीचे डिझेल चोरून अन्य चारचाकीतून पोबारा केला आहे. घटनास्थळी बेवारस इर्टीगा कार आढळून आली असून याच वाहनातून चोरटे आले असावेत असा अंदाज बांधला जात आहे. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.
मंगळसूत्र दुचाकीस्वारांनी केले लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– जॉगिंग ट्रॅक भागात फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळयातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले. ही घटना वर्दळीच्या गंगापूररोडवरील केबीटी सर्कल भागात घडली. या घटनेत सुमारे ७५ हजार रूपये किमतीच्या मंगळसुत्रावर चोरट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अश्विनी गोकुळ सुर्यवंशी (रा.सदगुरू अपा.पाटील नेस्ट,गंगापूररोड) यांनी फिर्याद दिली आहे. गेल्या १३ जुलै रोजी ही घटना घडली. सुर्यवंशी या जेवण आटोपून नेहमी प्रमाणे रात्रीच्या वेळी फेरफटका मारण्यासाठी केबीटी सर्कल येथील जॉगिंग ट्रॅकवर गेल्या होत्या. रस्त्याने त्या पायी जात असतांना पाठीमागून मोपेड दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ््यातील सुमारे ७५ हजार रूपये किमतीची मंगळसुत्र हिसकावून नेले. अधिक तपास हवालदार मोहिते करीत आहेत.