नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बसच्या प्रतिक्षेत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिलेस संमोहन करीत तिचे अलंकार लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत सलवार कुर्ता परिधान केलेल्या भामट्या महिलेने सुमारे ५४ हजाराच्या दागिण्यांवर डल्ला मारला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमन रामदास दातीर (५० रा.साईग्राम सोसा.अंबड लिंकरोड) यांनी फिर्याद दिली आहे. दातीर या गेल्या २४ जुलै रोजी नाशिकरोड भागात गेल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास त्या परतीच्या प्रवासासाठी शिवाजी महाराज पुतळा परिसरातील आनंद लॉन्ड्री भागात थांबल्या असता ही घटना घडली. अंबड येथे जाण्यासाठी त्या सीटी लिंक बसची वाट बघत असतांना सलवार कुर्ता परिधान केलेल्या एका महिलेने त्यांना गाठले.
यावेळी बोलण्यात गुंतवून सदर महिलेने संमोहन करीत दातीर यांनी परिधान केलेले गळयातील मंगळसूत्र पोत व कानातील कर्णफुले असे सुमारे ५४ हजार रूपये किमतीचे दागिणे काढण्यास भाग पाडले. अलंकार पदरात पडताच सदर महिलेने पोबारा केला असून अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.
