नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- एकतर्फी प्रेमातून तरूणीस मारहाण करीत विनयभंग केल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घाटात ढकलून देण्यासह स्व:ता आत्महत्या करण्याची धमकी दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला.
सनी धर्मवीर हटवाल (२४ रा.बागवानपुरा महात्मा फुले चौक,द्वारका) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादी नुसार ती कॉलजरोड भागात क्लासला जाते. गुरूवारी (दि.३) लेक्चर संपवून ती क्लास खाली उभी असतांना संशयिताने तिला गाठून तुझ्याकडे बघतो अशी धमकी दिली. त्यामुळे पीडितेने मैत्रीणीच्या भावास बोलावून घेत आपबिती कथन केली असता त्याने संशयिताला जाब विचारला.
तू त्रास का देतो अशी विचारपूस सुरू असतांना संशयिताने पीडितेच्या हातातील मोबाईल हिसकावून पोबारा केला होता. यानंतर त्याने मोबाईल परत करण्याच्या बहाण्याने आदित्य पेट्रोल पंपाशेजारील बिल्डींग भागात बोलावून घेत चारचाकीत बसण्यास भाग पाडले. संशयिताने कारमध्ये गंगापूररोडच्या दिशेने घेवून जात पीडितेकडे रिलेशनशिपची मागणी केली. पीडितेने नकार देताच संशयिताने तुला घाटात ढकलून देईल तसेच याबाबत कुणाकडे वाच्यता केली तर स्व:ताही आत्महत्या करण्याची धमकी दिल्याने हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.
दरम्यान याच कारणातून संशयिताने गेल्या २२ सप्टेंबर रोजी आपल्या चारचाकीत बळजबरीने बसविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र युवतीने नकार दिल्याने त्याने मारहाण करीत विनयभंग केल्याचे म्हटले आहे. अधिक तपास हवालदार सोळसे करीत आहेत.