नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वर्दळीच्या गंगापूररोडवरील शहिद चौकात असलेले दारू दुकान चोरट्यानी फोडले. या घटनेत गल्यातील ४५ हजाराच्या रोकडसह दारूसाठा असा सुमारे सव्वा चार लाखाचा मुद्देमाल भामट्यांनी लांबविला असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदिप भास्कर कोकाटे (रा.हॉटेल पामशेल शेजारी,मखमलाबादरोड) यांनी फिर्याद दिली आहे. कोकाटे यांचे गंगापूररोडवरील शहिद चौकात गंगापूर वॉईन शॉप नावाचे दारू दुकान आहे. मंगळवारी (दि.५) रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरची पट्टी तोडून ही चोरी केली.
दुकानात शिरलेल्या भामट्यांनी गल्यातील ४५ हजाराच्या रोकडसह महागड्या दारूच्या बाटल्या असा सुमारे ४ लाख ३३ हजार २७५ रूपये किमतीच्या मुद्देमाल चोरून नेला असून अधिक तपास हवालदार कहांडळ करीत आहेत.
……….
दुस-या घटनेत चोरट्यांनी दोन लॅपटॉप चोरले
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उघड्या घरात शिरून चोरट्यांनी दोन लॅपटॉप चोरून नेले. ही घटना अंबाजीनगर भागात घडली असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजीनगर येथील आदित्य गणेश जाधव (२१ हल्ली रा. वक्रतुंड रो हाऊर वरद गणेश मंदिराच्या मागे,अंबाजीनगर,पंचवटी) या युवकाने याबाबत फिर्याद दिली आहे. जाधव शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून तो आपल्या मित्रासमवेत वरिल पत्यावर वास्तव्यास आहे. मंगळवारी (दि.५) सकाळच्या सुमारास जाधव त्याचे मित्र कॉलेजला जाण्याची तयारी करीत असतांना अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात प्रवेश करून हॉलमध्ये चार्जीगला लावलेली सुमारे ३५ हजार रूपये किमतीचे दोन लॅपटॉप चोरून नेले. अधिक तपास हवालदार संदिप सानप करीत आहेत.