नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ट्रान्स्पोर्ट कार्यालयात शिरून तिघानी व्यावसायीकाकडे खंडणीची मागणी केल्याचा प्रकार द्वारका भागात घडला. पैसे देण्यास नकार दिल्याने संशयितांनी शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने व्यावसायीकाने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनू सुरेश पवार (रा.महालक्ष्मीचाळ,द्वारका), अजय राजू गणगे (रा.नानावली) व दिपक सुभाष माळी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित खंडणीखोरांची नावे आहेत. याबाबत संजय शिवनारायण राठी (रा. काठे गल्ली,द्वारका) यांनी फिर्याद दिली आहे. राठी यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून मथुरा हॉटेल पाठीमागील चंद्रभागा कॉम्प्लेक्समध्ये गोपी ट्रान्सपोर्ट नावाचे कार्यालय आहे.
मंगळवारी (दि.५) सायंकाळी ही घटना घडली. राठी आपला व्यवसाय सांभाळत असतांना तिघा संशयितांनी कार्यालयात शिरून त्यांच्याकडे पाच हजार रूपयांच्या खंडणीची मागणी केली. यावेळी राठी यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने संतप्त त्रिकुटाने त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. यावेळी जातांना संशयितांनी हातपाय तोडण्यासह जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने राठी यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक तोंडे करीत आहेत.