नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वाहतूक दंडाच्या नावाने सायबर भामट्यांनी शहरातील अनेकांचे बँक खाते रिकामे केल्याचा प्रकार समोर आला आहे. काहीनी दंडाची रक्कम स्व:ताहून भामट्यांना ऑनलाईन अदा केली असून या घटनेत सात लाख रूपयांना चूना लावण्यात आल्याचे पुढे आले आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर भामट्यांकडून गंडा घालण्यासाठी नवनवीन क्लुप्त्या शोधल्या जात असून गेल्या काही दिवसात प्रादेशिक परिवहन विभागाचा दंड असल्याचे भासवून अनेक वाहनधारकांना गंडविल्याचे वास्तव समोर आले आहे. फिर्यादीव व तक्रारदार आपला मोबाईल चाळत असतांना त्याना आरटीओचे वाहतूक चलन नावाचा मॅसेज आला होता. हा संदेश वाचून संबधितांनी भामट्यांनी पाठविलेल्या लिंकच्या माध्यमातून माहिती भरली असता ही फसवणुक झाली. आधार व पॅनकार्ड बाबतची माहिती भरली असता संबधीतासह त्यांच्या कुटुंबियाच्या बँक खात्यावर भामट्यांनी डल्ला मारला आहे. या घटनेत तक्रारदार व त्यांच्या मुलांच्या बँक खात्यातील ५ लाख ९० हजार ५०० रूपयांची रक्कम अन्य खात्यात वर्ग करण्यात आली असून राजेंद्र बैरागी नामक व्यक्तीने तोतयांच्या भूलथापांना बळी पडत त्यांनी पाठविलेल्या लिंकच्या माध्यमातून एक लाख रूपये दंडाची रक्कम अदा केली आहे.
या घटनेत ६ लाख ९० हजार ५०० रूपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्राथमिक असल्याची माहिती असली तरी फसवणूक झालेल्यांचा आकडा मोठा असल्याचे बोलले जात आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे करीत आहेत.