नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही या रागातून तिघांनी एका रिक्षाचालकास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना भगूर येथे घडली. या घटनेत फायटर व लाकडी दांडक्याने मारहाण करून गळा दाबण्यात आल्याने रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उलबक्ष उर्फ अली अल्ताफ कुरेशी, कैफ उर्फ भुºया शेख व शोएब पठाण अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून त्यातील कुरेशी व शेख पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. याबाबत सागर पांडूरंग जाधव (३५ रा.गायकवाड चाळ जयभवानीरोड) या रिक्षाचालकाने फिर्याद दिली आहे. जाधव बुधवारी (दि.६) भगूर येथे गेले होते. दुपारच्या सुमारास बसस्टॅण्ड जवळील भगूर नाक्याकडे जाणा-या मार्गावर असलेल्या चिंचेच्या झाडाखाली ते थांबलेले असतांना ही घटना घडली. तिघा भामट्यांनी गाठून त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. यावेळी जाधव यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने संतप्त संशयितांनी त्यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली.
या घटनेत लोखंडी फायटर व लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याने जाधव जखमी झाले असून संशयितांनी बघ्यामध्ये दहशत माजविण्याच्या उद्देशाने जाधव यांचा गळा दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. अधिक तपास उपनिरीक्षक देवरे करीत आहेत.