नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मॅफेड्रॉन तथा एमडी या अमली पदार्थाची विक्री करणारा प्लेडर पोलीसांच्या जाळयात अडकला. संशयिताच्या ताब्यात २५ हजार ५०० रूपये किमतीचे ५.५ ग्रॅम वजनाचे एमडी सदृष्य अंमलीपदार्थ जप्त करण्यात आला असून याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खालीद कय्युम शाह (२९ रा.म्हाडा वसाहत,वडाळागाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयित प्लेडरचे नाव आहे. शाह आपल्या घरातून एमडी या अमली पदार्थाची विक्री करीत असल्याची माहिती इंदिरानगर पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने संशयिताच्या घरी धडक देत छापा टाकला.
संशयिताच्या घरझडतीत लाकडी पलंगाजवळ असलेल्या पिशवीमध्ये एमडी सदृष्य अंमलीपदार्थच्या लहान पुडया आढळून आल्या असून या कारवाईत सुमारे २५ हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत हवालदार अमजद पटेल यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अंकुर्लीकर करीत आहेत.