नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- औद्योगीक वसाहतीतील चुंचाळे शिवार व पाथर्डी फाटा भागात झालेल्या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे सव्वा दोन लाखाचा ऐवज लंपास केला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी इंदिरानगर व अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
चुंचाळे शिवारातील सोनू कृष्णदेव सिंग (रा. बिल्डींग नं. ११ घरकुल योजना चुंचाळे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सिंग कुटुंबिय सोमवारी (दि ४) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सुमारे १ लाख ७ हजार ७८५ रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.
दुसरी घरफोडी पाथर्डी फाटा भागात झाली. इंदू गणपत शार्दुल (रा.गोमती अपा.सिध्दी विनायक मंदिराशेजारी प्रशांतनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शार्दुल कुटुंबिय गेल्या ३१ जुलै रोजी दुपारच्या सुमारास अल्पावधीसाठी घराबाहेर पडले असता ही घरफोडी झाली. भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूमधील लोखंडी कपाटात ठेवलेली पाच हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा एक लाख ५ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार पटेल करीत आहेत.