नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ग्राहकांच्या लाखोंच्या दागिण्यांवर डल्ला मारणा-या सराफास पोलीसांनी ताब्यात घेतले. तारण गहाणच्या बहाण्याने अलंकाराचा अपहार केला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर सुधाकर माळवे (४३ रा.आरटीओ समोर, पेठरोड) असे पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित सराफाचे नाव आहे. याबाबत लता प्रकाश राजपूत (रा.ओमनगर,नामको हॉस्पिटल जवळ पेठरोड) यांनी फिर्याद दिली आहे. माळवे याचे आरटीओ कार्यालयासमोर रोहित ज्वेलर्स नावाची सराफी दुकान आहे. संशयिताने ग्राहकांचा विश्वास संपादन केल्याने परिसरातील महिला आपली आर्थिक चणचण मिटविण्यासाठी त्याच्याकडे अलंकार तारण गहाण ठेवून आपली अडचण दूर करतात.
२०२३ मध्ये राजपूत याच्यासह काही महिलांनी त्याच्याकडे सुमारे ७ लाख १ हजार रूपये किमतीचे अलंकार तारण गहाण ठेवले होते. या दागिण्यांचा संशयिताने अपहार केल्याचा आरोप करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक सचिन चव्हाण करीत आहेत.