नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात वाहनचोरीची मालिका सुरूच असून वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरट्यांनी पळवून नेल्या. याबाबत मुंबईनाका,सरकारवाडा व इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कामटवाडा येथील वैभव सतिश जोशी (रा.बंदावणेनगर) हे गेल्या २९ जुलै रोजी सकाळी मुंबईनाका भागात गेले होते. सुयोजीत कॉम्प्लेक्स मधील डेटामॅटिक्स ग्लोबल सर्व्हीसच्या पार्किंगमध्ये लावलेली त्यांची एमपी ६८ एमए १२२४ मोटारसायकल चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवादार गोडे करीत आहेत.
दुसरी घटना मेळा बसस्थानक आवारात घडली. गिरीश वसंत उदास (रा.पेठ मखमलाबाद लिंकरोड तुळजा भवानी नगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. उदास गेल्या २९ जुलै रोजी मेळा बसस्थानकात गेले होते. पार्किंगमध्ये लावलेली त्यांची एमएच १५ बीजे ९३७३ मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक आव्हाड करीत आहेत.
तिसरी घटना पाथर्डी फाटा भागात घडली. संदिप सुनिल माळेकर (रा. शिवांजली रो हाऊस दामोदर चौक) यांनी फिर्याद दिली आहे. माळेकर यांची एमएच १५ केई १६२८ दुचाकी गेल्या २५ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास त्यांच्या श्री कॉस्मेटीक दुकानासमोर पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार गांगुर्डे करीत आहेत.