नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गिफ्ट हाऊसमध्ये बालकामगाराची नेमणुक करणे एका व्यावसायीकास चांगलेच महागात पडले आहे. कामगार उपायुक्त कार्यालयाच्या पथकाने छापा टाकत या घटनेचा पर्दाफास केला असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमराराम जिवाराम सिरवी (रा.देवराम कॉम्प्लेंक्स रिलायन्स पेट्रोल पंपासमोर दिंडोरीरोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यावसायीकाचे नाव आहे. याबाबत दुकाने निरीक्षक विशाल पाटील यांनी फिर्याद दिली आहे. सिरवी याचे रिलायन्स पेट्रोल पंपा समोर प्रेम गिफ्ट हाऊस नावाचे दुकान आहे. या दुकानात अल्पवयीन कामगार काम करीत असल्याची तक्रार कामगार उपायुक्त कार्यालयास प्राप्त झाली होती.
त्यानुसार सोमवारी (दि.४) वरिष्ठांच्या आदेशानुसार दुपारच्या सुमारास छापा टाकण्यात आला. या ठिकाणी १५ वर्षीय मुलाकडून अल्पमोबदल्यात जास्तीचे काम करून घेतले जात होते. तसेच त्यास क्रुरपणे वागणूक दिली जात असल्याचे पुढे आले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक तुरे करीत आहेत.