नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- एकतर्फी प्रेमातून एकाने महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग केल्याचा प्रकार शहरातील एका नामांकित महाविद्यालय आवारात घडला. तीन महिन्यांपासून बोलत नाही तसेच सोशल मीडियावर कोणाला लाईक आणि फॉलो करते या संशयातून तरूणाने माझी नाही तर कोणाची नाही या उक्तीप्रमाणे मारहाण करीत हे कृत्य केले असून, याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहूल विष्णू काशिद (२४ रा.) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडिता व संशयित एकाच महाविद्यालयात शिक्षण घेतात. गेल्या काही महिन्यांपासून संशयित पीडितेचा पाठलाग करीत होता. शनिवारी (दि.२) सायंकाळच्या सुमारास पीडिता महाविद्यालय सुटल्यानंतर पार्किंगमध्ये आपली दुचाकी घेण्यासाठी गेली असता ही घटना घडली. संशयिताने गेल्या तीन महिन्यांपासून माझ्याशी का बोलत नाही. या कारणातून वाद घातला यावेळी संशयिताने पीडितेच्या मैत्रीणीं समक्ष हात पिरगळून तू इन्स्टाग्रामवर कोणाला लाईक व फॉलो करते याबाबत जाब विचारत मारहाण केली.
तू मला आवडतेस, याचे परिणाम वाईट होतील असे म्हणत संशयिताने माझी नाही तर कोणाची नाही अशी धमकी दिल्याने पीडितेने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.