नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागातून चार मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी पंचवटी सातपूर अंबड व इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या आहेत.
गणेशवाडीतील विशाल विलासराव तांबे (रा.संत सावता माळी अपा. देवी मंदिरामागै गणेशवाडी) यांची अॅक्टीव्हा एमएच १५ ईवाय ६६८७ गेल्या ७ जुलै रोजी रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार जाधव करीत आहेत.
दुसरी घटना औद्योगीक वसाहतीतील महिंद्रा कंपनी भागात घडली. रविंद्र रामू कामडी (रा.हनुमान मंदिरासमोर मोतीवाला कॉलेज ध्रुवनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कामडी गेल्या २६ जुलै रोजी महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनी भागात गेले होते. गेट नं.३ समोर त्यांनी आपली स्प्लेंडर एमएच १५ ईएन ४१३८ पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार क्षिरसागर करीत आहेत.
तिसरी घटना सिडकोतील लेखानगर भागात घडली. मच्छींद्र युवराज कापसे (रा.इंदिरागांधी वसाहत क्र.१) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कापसे यांची स्प्लेंडर एमएच १५ एचएक्स ०६२९ गुरूवारी (दि.३१) रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार देसले करीत आहेत. तर चेतन सुरेश भावसार (रा.शुभमकरोती अपा. गजरा निसर्ग सोसा.जवळ परबनगर) यांची एमएच १५ एफएच ६५४३ मोटारसायकल गेल्या २९ जुलै रोजी रात्री त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार साळी करीत आहेत.