नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने शहरातील एकास सायबर भामट्यांनी साडे सात लाख रूपयांना गंडविले. अल्पावधीत भरघोस परताव्याचे आमिष दाखवत भामट्यांनी ही फसवणुक केली असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्याशी गेल्या जुलै महिन्यात भामट्यांनी संपर्क साधला होता. त्यानंतर त्यांना झेड ४ एचडीएफसी सिक्युरिटी या व्हॉटसअप ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. या ग्रुपचे अॅडमिन विरोनिका गुप्ता यांनी तक्रारदाराशी संपर्क साधत त्यांना शेअर मार्केटमध्ये ट्रेंडिग करून नफा कमविण्याचे आमिष दाखविले.
यानंतर एचडीएफसी बँकेची नाव व लोगो असलेली लिंक पाठवून ही फसवणुक करण्यात आली. तक्रारदारास वेळोवेळी वेगवेगळया बँक खात्यांमध्ये ७ लाख ३९ हजार ४७१ रूपयांची रोकड भरण्यास भाग पाडले असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे करीत आहेत.