नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सोशल मिडीयावर सक्रिय राहणे एका ६० वर्षीय वृध्देस चांगलेच महाग पडले आहे. फेसबुक मित्राने विश्वास संपादन करीत महिलेचे सव्वा तीन लाख रूपये किमतीचे अलंकार लांबविले असून याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनय भिडे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित फेसबुक मित्राचे नाव आहे. याबाबत भगूर बसस्थानक परिसरात राहणा-या ६० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. सोशल मिडीयावर सक्रीय राहणा-या महिलेचे काही दिवसांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून संशयिताशी ओळख झाली होती. दोघांमध्ये सातत्याने चॅटींग होत असल्याने त्याने अधुन मधून व्यवसायानिमित्त नाशिकला येत असल्याचे सांगितले. महिलेनेही या मित्रास आपल्या घरी येण्याचा आग्रह धरल्याने ही फसवणुक झाली. गुरूवारी (दि.३१) दुपारच्या सुमारास सुटाबुटातील संशयिताने महिलेचे घर गाठले. महिलेनेही आपली नणंद व मोलकरणीच्या मदतीने मित्रासाठी सुग्रास पाहुणचार केला. दोन अडिच तासांच्या कालावधीत दोघांमध्ये गप्पा गोष्टी झाल्या. यावेळी संशयिताने विश्वास संपादन करीत महिलेच्या अंगावरील अलंकार बदलून देण्याची ग्वाही दिली.
त्यानुसार बोलीबच्चन संशयिताच्या आमिषाला बळी पडलेल्या महिलेने हातातील सोन्याच्या बांगडया, पाटल्या व हिरे जडित अंगठी असे सुमारे सव्वा तीन लाख रूपये किमतीचे दागिणे संशयिताच्या स्वाधिन केले. नव्याने दागिणे घडवून आणण्यासाठी गेलेला अनोळखी संशयित चोवीस तास उलटूनही घरी न परतल्याने वृध्देने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक देवरे करीत आहेत.