नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर व परिसरात मोटारसायकल चोरीचे प्रकार वाढले असून वेगवेगळ्या भागातून चोरट्यांनी पाच दुचाकी पळवून नेल्या. याप्रकरणी म्हसरूळ, सातपूर, मुंबईनाका, नाशिकरोड व आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीसांनी भामट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
आशेवाडी ता.जि.नाशिक येथील सुरेश शिवाजी बोडके हे रविवारी शहरात आले होते. सायंकाळच्या सुमारास त्यांची स्प्लेंडर एमएच १५ जीटी ११९४ पेठरोडवरील शिवसिध्दी सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार फुगे करीत आहेत.
दुसरी घटना तपोवनात घडली. याबाबत नरेश रमेश चव्हाण (रा.नागरे चौक,अशोकनगर सातपूर) यांनी फिर्याद दिली आहे. चव्हाण रविवारी (दि.२७) तपोवनात गेले होते. स्वामी नारायण मंदिरासमोर पार्क केलेली त्यांची एमएच १८ एएल १२८५ चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार राजूळे करीत आहेत.
तिसरी घटना चांडक सर्कल भागात घडली. प्रमोद बाजीराव श्रींगी (रा.सुशिला अपा.शनिचौक पंचवटी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. श्रींगी रविवारी (दि.२८) गोल्फ क्लब भागात गेले होते. एक नं.बर प्रवेशद्वार भागात लावलेली त्यांची एमएच १५ एफझेड ०९९१ दुचाकी चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.
चौथी घटना सातपूर एमआयडीसीत घडली. बबलू सुनिल पाटील (रा.जनार्दन स्वामी मंदिरामागे कार्बननाका) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पाटील शनिवारी (दि.२६) औद्योगीक वसाहतीतील ज्योती स्ट्रक्चरर्स कारखाना भागात गेले होते. कारखान्याच्या बाहेर पार्क केलेली त्यांची प्लॅटीना एमएच १९ डीएफ ७२२० चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.
तर शंकर अमृत भोर (रा. समाज मंदिराजवळ,शिवाजीनगर जेलरोड) यांची ॲक्टीव्हा एमएच १५ जीजे ९६५१ गेल्या शनिवारी (दि.२६) रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार ठेपणे करीत आहेत.