नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणुक करणे शहरातील एका व्यावसायकीस चांगलेच महागात पडले आहे. गुंतवणुकीवर अधिकच्या नफ्याचे आमिष दाखवून दोघा भामट्यांनी तब्बल २२ लाख रूपयांना व्यावसायीकास गंडविले असून दोन वर्ष उलटूनही गुंतवणूकीची रक्कम व मोबदला पदरात न पडल्याने व्यावसायीकाने पोलीसात धाव घेतली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहूल दिलीप साळूंखे व निलेश बाळकृष्ण जगताप अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित ठकबाजांची नावे आहेत. याबाबत पंकज हरिष सानप (रा. कर्मयोगीनगर गोविंदनगर) या व्यावसायीकाने फिर्याद दिली आहे. सानप व संशयित एकमेकांचे परिचीत असून फेब्रुवारी २०२३ मध्ये संशयितांनी त्याना गाठून शेअर्स मार्केट मधील गुंतवणुकीतून मिळणा-या भरघोस मोबदल्याची माहिती दिली होती. सानप यांच्या घरी जावून दोघांनी शेअर मार्केटचे महत्व पटवून दिल्याने त्यांचा विश्वास बसला.
या काळात संशयितांना वेळोवेळी २१ लाख ९० हजाराची रक्कम संशयितांच्या स्वाधिन करण्यात आल्याने ही फसवणुक झाली. दोन वर्ष उलटूनही गुंतवणुकीसह मोबदल्याची रक्कम पदरात न पडल्याने सानप यांनी तगादा लावला असता संशयितांनी टाळाटाळ केली. त्यामुळे सानप यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक घुनावत करीत आहेत.