नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दारू पिण्यास पैसे दिले नाही या कारणातून एका सराईताने तरूणावर प्राणघातक हल्ला करीत खिशातील ५२ हजार रूपयांची रोकड लांबविली. ही घटना राहूरी फाटा भागात घडली असून, याघटनेत धारदार शस्त्राचा वापर करण्यात आल्याने २६ वर्षीय युवक गंभीर जखमी झाला आहे. याबाबत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय हासे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित हल्लेखोराचे नाव असून तो नाशिकरोड व देवळाली कॅम्प पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. याबाबत अजित प्रल्हाद घुगे (रा.राहूरी – विंचूर दळवी ता.जि.नाशिक) या युवकाने फिर्याद दिली आहे. घुगे याचा नर्सरीचा व्यवसाय आहे. बुधवारी (दि.३०) रात्री राहूरी फाटा भागात गेला होता. शिवद्वार हॉटेल समोर संशयिताने त्यास गाठत दारू पिण्यासाठी पैश्यांची मागणी केली. यावेळी घुगे याने पैसे देण्यास नकार दिल्याने ही घटना घडली. संतप्त संशयिताने त्यास शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी त्याने खिशातील ५२ हजाराची रोकड बळजबरीने काढून घेतले. रक्कम काढत असतांना घुगे याने प्रतिकार केला असता संशयिताने कमरेस लावलेले धारदार शस्त्र काढून घुगे याच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला.
या घटनेत घुगे याने प्रसंगावधान राखत वार चुकविल्याने तो बालंबाल बचावला असला तरी त्याच्या कपाळास मोठी इजा झाली आहे. यावेळी काही नागरीकांनी घुगे यास वाचविण्याचा प्रयत्न केला असता संशयितांने फायटर व लाकडी दांडक्याचा धाक दाखवत त्यांच्या अंगावर धावून जात दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक डुकरे करीत आहेत.