नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– वैद्यकीय व्यवसायात अडचणी निर्माण करण्याची धमकी देत तोतयानी एका डॉक्टर दांम्पत्याकडे पाच लाखाची मागणी करीत ५० हजार रूपयांची खंडणी वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात खंडणी, अॅट्रोसिटी व दिव्यांग कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोहर पाटील व योगेश पाटील अशी संशयित खंडणीखोरांची नावे आहेत. याबाबत डॉ. अंजली धादवड यांनी फिर्याद दिली आहे. डॉ. धादवड या स्त्रीरोग तज्ञ असून त्यांचा कालिका मंदिर परिसरात ब्लॉस्मस नावाचे हॉस्पिटल आहे. धांदवड यांचे दिव्यांग पतीही डॉक्टर असून ते सिन्नर येथे व्यवसाय सांभाळतात. सिन्नर येथील सखूबाई शिंदे या रूग्ण महिलेच्या तक्रारी अर्जाच्या संदर्भात चौकशी करून संशयितांनी डॉक्टर दाम्पत्याकडे पाच लाखाच्या खंडणीची मागणी केली होती.
पत्रकार असल्याचे भासवून संशयितांनी ही खंडणी वसूल केली. अनधिकृत चायनलसाठी पेड न्युज अथवा आर्थिक लाभासाठी खंडणीची मागणी करीत वैद्यकीय व्यवसायात अडचणी निर्माण करण्याची धमकी दिली होती. गेल्या ७ जुलै रोजी दुपारी संशयितांनी हॉस्पिटलमधील कर्मचारी सागर भांगरे याच्या हस्ते अनंत कान्हेरे मैदानावर ५० हजार रूपयांची खंडणी वसूल केल्याचे फिर्यादीत म्हटले असून, अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गौतम सुरवाडे करीत आहेत.