नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शासकिय नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने एका महिलेस भामट्यांनी चार लाख रूपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. वर्ष उलटूनही नोकरी न लागल्याने व संशयितांनी पैसे परत न केल्याने महिलेने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भारती प्रमोद कुमावत (रा.प्रभात कॉलनी,लेखानगर) व स्वप्नील रामदास परदेशी (रा.मनमाड,नांदगाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित ठकबाजांची नावे आहेत. तक्रारदार यांची संशयित महिलेशी ओळख झाली होती. यावेळी तिने आपली व परदेशी याची शासन दरबारी मोठ्या ओळखी असल्याचे भासवून तक्रारदार महिलेच्या बेरोजगार मुलास शासकिय सेवेत दाखल करून देण्याची ग्वाही दिली.
सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून दोघा भामट्यांनी गेल्या वर्षी गायकवाड यांच्याकडून ३ लाख ९९ हजार ३४१ रुपए स्विकारले. मात्र वर्ष उलटूनही नोकरी लागली नाही. त्यामुळे गायकवाड यांनी पैश्यांचा तगादा लावला असता संशयितांनी टाळाटाळ केली. फसवणुक झाल्याचे लक्षात येताच गायकवाड यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास हवालदार पारणकर करीत आहेत.