नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जळगाव येथील बांधकाम व्यावसायीकास जमिन खरेदी विक्री व्यवहारात एका दांम्पत्याने साडे दहा लाख रूपयांचा गंडा घातला. विक्री केलेला भूखंड दांखवून ही फसवणुक करण्यात आली असून, न्यायालयाच्या आदेशानुसार याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शोभा रमेश साळवे व रमेश रावजी साळवे (रा.दोघे शिंदे ता.जि.नाशिक) अशी बांधकाम व्यावसायीकास गंडा घालणा-या संशयित दांम्पत्याचे नाव आहे. याबाबत दिलीप हरिसिंग राठोड (रा.पारोळा.जि.जळगाव) यांनी फिर्याद दाखल केली आहे. राठोड यांचा निर्मिती बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स नावाने व्यवसाय असून २०१३ मध्ये हा व्यवहार झाला होता. परिचीत असलेल्या साळवे दांम्पत्याने आपले मौजे शिंदे ता.जि.नाशिक शिवारातील प्लॉट असल्याचे सांगून ते तुम्ही खरेदी करावे अशी गळ घातली होती. त्यामुळे राठोड यांनी हा व्यवहार केला. यापोटी १० लाख ३८ हजाराची रक्कम अदा करण्यात आल्याने संशयितांनी आपल्या गट नं. ७९७ या जमिनीपैकी ४००.०० चौ.मी क्षेत्राचे खरेदी खत दस्त क्रमांक ३२० – २०१८ करून दिले होते. याबाबत दि. १२ जानेवारी रोजी दुय्यम निंबधक नाशिक -२ या कार्यालयात नोंदणी झाली होती.
मात्र त्यानंतर सदर मिळकत खरेदी खत करण्यापूर्वीच संशयितांनी इतरांनाही विक्री केल्याचे समोर आले असून याबाबत बांधकाम व्यावसायीक राठोड यांनी न्यायालयात दाद मागितली होती. अखेर न्यायालयाच्या आदेशाने संशयित दांम्पत्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले असून अधिक तपास उपनिरीक्षक बिडकर करीत आहेत.