नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर परिसरात वाहन चोरीची मालिका सुरूच असून, पार्क केलेला आयशर मालट्रकसह चोरट्यांनी वेगवेगळ्या भागातून दोन मोटारसायकली नुकत्याच चोरून नेल्या. याप्रकरणी अंबड,गंगापूर व सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सिडकोतील राहूल चोपसिंग पाटील (रा.सावतानगर,सिडको) यांचा आयशर मालट्रक एमएच ०४ डीके ९९०८ गेल्या रविवारी (दि.२७) रात्री कामटवाडा रोडवरील धन्वंतरी मेडिकल कॉलेज परिसरातील सप्तश्रृगी देवी मंदिर परिसरात लावलेला असतांना तो चोरट्यांनी पळवून नेला. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक गुंड करीत आहेत.
मोटारसायकल चोरीची पहिली घटना ध्रुवनगर येथे घडली. मधुमती मोहन गवांदे (रा. निवारा बंगलो,मोतीवाला कॉलेजजवळ,त्र्यंबकराजनगर ध्रुवनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. गवांदे यांची एमएच १५ केबी ८९८७ मोटारसायकल गेल्या बुधवारी (दि.१६) दुपारच्या सुमारास बंगल्याच्या प्रवेशद्वाराजवळ लावलेली असतांना ती चोरट्यानी चोरून नेली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार पाटील करीत आहेत. दुसरी घटना सातपूरगावात घडली. याबाबत नितीन सुरेश भंदूरे (रा.पुंडलीक शॉपींग सेंटर,माळी मंगल कार्यालय सातपूर ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. भंदूरे यांची ॲक्सेस मोपेड एमएच १५ जीपी ३२४९ गेल्या सोमवारी (दि.२१) रात्री त्यांच्य घरासमोर लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.