नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लग्नाचे आमिष दाखवून एकाने तरूणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. युवतीने लग्नाचा तगादा लावला असता संशयिताने नकार देत आत्महत्या करण्याची धमकी दिल्याने तरूणीने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम आबाराव देशमुख (रा.दोनवडे ता.वसमत जि.हिंगोली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या युवतीने याबाबत फिर्याद दिली आहे. ऑगष्ट २०२४ मध्ये संशयिताने तरूणीची भेट घेतली होती. या भेटीनंतर दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्याने ही घटना घडली. आठ महिन्यांच्या काळात संशयिताने मालेगाव स्टॅण्ड येथील आशिर्वाद लॉज, पेठ फाटा येथील बालाजी लॉज तसेच ठाणे येथील बहिणीच्या घरी घेवून जात युवतीवर वेळोवेळी बलात्कार केला.
यानंतर युवतीने विवाहासाठी तगादा लावला असता संशयिताने तिच्याशी मोबाईलवर संपर्क साधत लग्नास नकार दिला. तसेच तू मला जर त्रास दिला तर मी जीवाचे बरे वाईट करून घेईन अशी धमकी दिल्याने तरूणीने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.