नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– वाढीव खंडणी देण्यास नकार दिल्याने टोळक्याने हॉटेलमध्ये शिरून धुडघूस घातल्याचा प्रकार पाथर्डी शिवारातील आनंदनगर भागात घडला. या घटनेत हॉटेल मालकास जीवे ठार मारण्याची धमकी देत टोळक्याने धारदार कोयत्याच्या सहाय्याने हॉटेलमध्ये तोडफोड करीत गल्यातील रोकड बळजबरीने काढून नेली असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीसांना चार जणांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.
विठ्ठल आनंद मते (२१), रितेश हरिभाऊ लाटे (१९ ),ओम राजू भदरगे (१९ रा. तिघे स्वराज्यनगर पाथर्डी फाटा) व सौम्यक संदिप उन्हवणे (१९ रा.रॉयल बेकरी जवळ,अश्विननगर,अंबड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून समर्थ व अनिकेत नावाचे त्यांचे साथीदार अद्याप फरार आहेत. याबाबत किशोर सर्जे राव थोरात (रा.खंडेरावनगर,पाथर्डी फाटा) यांनी फिर्याद दिली आहे. थोरात हॉटेल व्यावसायीक असून त्यांचे आनंदनगर येथील चायनिज कॉर्नर भागात एस.के.नावाचे हॉटेल आहे. संशयित टोळक्याची या भागात मोठी दहशत असून, व्यवसाय सुरळीत चालू ठेवण्यासाठी ते व्यावसायीकांकडून खंडणी उकळत असल्याचे बोलले जाते.
गेल्या एप्रिल पासून दर आठवड्याला थोरात यांच्या कडून ते एक हजार रूपये खंडणी उकळत होते. रविवारी (दि.२७) हॉटेलमध्ये शिरलेल्या संशयीतांनी थोरात यांच्याकडे वाढीव खंडणीची मागणी केली. मात्र थोरात यांनी खंडणी देण्यास नकार दिल्याने ही घटना घडली. संतप्त टोळक्याने धारदार कोयत्याचा धाक दाखवित दहशत निर्माण करीत थोरात यांना शिवीगाळ केली तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देत त्यांनी हॉटेलमध्ये तोडफोड केली. यावेळी टोळक्याने हॉटेलच्या गल्याचीत चार ते पाच हजार रूपयांची रोकड बळजबरीने काढून घेत पोबारा केला असून त्यातील चौघांना पोलीसांनी हुडकून काढत बेड्या ठोकल्या आहेत. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सोनार करीत आहेत.