नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून वेगवेगळ्या भागात झालेल्या दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे अडीच लाख रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी मुंबईनाका व उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ज्योती अशोक कुलकर्णी (रा.गायकवाडनगर,तिडके कॉलनी) यानी दिलेल्या फिर्यादी नुसार कुलकर्णी कुटुंबिय ५ ते १६ जुलै दरम्यान मुलीकडे मुंबई येथे गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या बाथरूमच्या काचा फोडून घरात प्रवेश केला. घरात शिरलेल्या भामट्यानी बेडरूममधील कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिणे व मोबाईल असा सुमारे १ लाख ६४ हजार ४५१ रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार सोनार करीत आहेत.
दुसरी घटना नारायणबापूनगर भागात घडली. विवेक चंद्रकांत गांगुर्डे (र.नारायण बापूनगर,जेलरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. गांगुर्डे कुटुंबिय दि.२५ ते २७ जुलै दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले २५ हजाराचे रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ८५ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.