नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शेअर मार्केटमधील गुंतवणुक शहरातील एका तरूणास चांगलेच महागात पडले आहे. मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून पुण्याच्या ब्रोकरने युवकास तब्बल २३ लाखास गंडविले असून संशयिताने अनेकांना याप्रकारे गंडा घातल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश भास्कर टिळे (रा.मिटकॉन कॉलेज मागे बालेवाडी,पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित ठकबाजाचे नाव आहे. याबाबत अविनाश मधुकर बागुल (रा.समर्थ नगर,जत्रा हॉटेल) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित टिळे याने सन.२०२२ मध्ये बागुल यांची भेट घेतली होती. गोल्फ क्लब भागात झालेल्या भेटीत संशयिताने बागुल यांचा विश्वास संपादन करीत मार्केट मिरेकल कंपनी मार्फत शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास वेगवेगळया योजनांच्या माध्यमातून अधिकचा परतावा मिळेल असे आमिष दाखविले.
त्यानुसार बागुल यांनी ६ जानेवारी २०२२ ते १३ जून २०२३ दरम्यान संशयिताच्या माध्यमातून वेळोवेळी तब्बल २२ लाख ८५ हजार रूपयांची गुंतवणुक केली. यानंतर मात्र दोन वर्ष उलटूनही बागुल यांच्या पदरात परतावा व गुंतवणुकीची रक्कम न पडल्याने त्यांनी पोलीसात धाव घेतली असून भामट्याने याप्रकारे अनेकांना भुलथापा देत गंडविल्याचा अंदाज फिर्यादीत वर्तविण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक गोडे करीत आहेत.