नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वैद्यकिय मदतीसाठी संपर्क करून बोलविलेल्या आपत्कालीन रुग्णवाहिकेवरील महिला डॉक्टरसोबत शाब्दिक वाद घालून मारहाण केल्याचा प्रकार द्वारका परिसरात घडला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संशयित रामसिंग बावरी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. नाहील मुस्ताक खतीब (४७, रा. अशोकामार्ग) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. डॉ. खतीब या बुधवारी (दि.२३) १०८ अॅम्ब्युलन्सवर सेवा बजावत असतांना ही घटना घडली. सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास वैद्यकिय मदतीचा कॉल बावरी यांच्याकडून प्राप्त झाला होता. यानुसार मोरवाडी अंबड येथील शासकिय रुग्णवाहिकेबर (एमएच १४ सीएल ११२९) इमर्जन्सी डॉक्टर म्हणून खतीब या कर्तव्यावर होत्या.
चालक सागर कदम यांच्यासोबत त्यांनी काही मिनिटांत घटनास्थळ गाठले. तेथे रस्त्यावर पडलेल्या अनोळखी रुग्णाबाबत बावरी यांच्याकडे प्राथमिक विचारपूस केली असता, त्यांना त्याचा राग येवून कानशिलेत लगावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.