नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- चोरीस गेलेल्या मोबाईलचा गैरवापर करीत भामट्यांनी फोन पे च्या माध्यमातून बँक खात्यातील ३६ हजाराची रोकड परस्पर काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. खरेदीसह अन्य खात्यात पैसे वर्ग करण्यात आल्याने ही फसवणुक उघड झाली असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुधाकर ओंकार महाजन (६६ रा. संभाजी स्टेडिअम जवळ अश्विननगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. महाजन गेल्या रविवारी (दि.१३) सिडकोतील शिवाजी चौक परिसरात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेले असता ही घटना घडली होती. भाजीपाला खरेदी करीत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिशातील सुमारे दहा हजार रूपये किमतीचा मोबाईल चोरून नेला होता.
या घटनेस दोन दिवस उलटत नाही तोच चोरट्यांनी मोबाईलचा गैरवापर करीत महाजन यांच्या बॅक खात्यावर डल्ला मारला. फोन पे अॅपच्या माध्यमातून त्यांच्या एचडीएफसी बँकेच्या वेगवेगळया खात्यातून २१ हजार ६३० व १४ हजार ७४० परस्पर काढून घेण्यात आली असून त्यातील एक रक्कम अन्य खात्यात वर्ग करण्यात आली तर दुस-या रकमेतून ऑनलाईन खरेदी करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.