नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– धुणी- भांडी करण्यासाठी गेलेल्या मोलकरणीचा मृतदेह इमारतीच्या टेरेसमधील पाण्याच्या टाकीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. काळेनगर भागात हा प्रकार उघडकीस आला असून महिलेने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला याबाबत उलटसुलट चर्चेस उधाण आले आहे. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अश्विनी गणेश इंगोळे (३३ रा.संतकबीरनगर,भोसला स्कूल मागे आनंदवली) असे मृत महिलेचे नाव आहे. इंगोळे या काळेनगर भागात धुणी- भांडी करण्याचे काम करायच्या. शनिवारी (दि.१९) नेहमी प्रमाणे त्या सुयश सोसायटीत गेल्या होत्या. कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या इंगोळे रात्री उशीरापर्यत न परतल्याने कुटुंबियांनी त्यांची शोधाशोध केली मात्र त्या मिळून आल्या नाहीत. रविवारी (दि.२०) त्यांचा मृतदेह ज्या इमारतीत कामास गेल्या होत्या त्याच सुयश अपार्टमेंटच्या टेरेस वरिल पाण्याच्या टाकीत मिळून आला.
पाण्यात बुडालेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आल्याने त्यांना तातडीने बेशुध्द अवस्थेत जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. त्यांनी आत्महत्या केली की त्याचा घातपात झाला याबाबत उलटसुलट चर्चेस उधाण आले असून अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.