नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– प्रवासी पळवापळवीच्या वादातून दोघांनी एका रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना हनुमाननगर भागात घडली. या घटनेत रिक्षाचालक जखमी झाला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश उर्फ बंटी काळे उर्फ पाथरवड (३३) व गणेश पाथरवड (रा.दोघे कोहीनुरनगर,बी.डी.कामगारनगर अमृतधाम) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत. याबाबत किशोर शिवाजी घाडगे (रा.बीडी कामगारनगर अमृतधाम) या रिक्षाचालकाने फिर्याद दिली आहे. घाडगे गुरूवारी (दि.१७) सायंकाळच्या सुमारास बळी मंदिराजवळील रिक्षा थांब्यावर आपली अॅटोरिक्षा पार्क करून प्रवाशी भरत असतांना ही घटना घडली.
अमृतधामकडून रिक्षा घेवून आलेल्या दोघा संशयितांनी घाडगे यांच्याशी प्रवासी भरण्याच्या वादातून शिवीगाळ व दमदाटी केली. यावेळी घाडगे यांनी मित्र विलास भोसले यांच्या रिक्षात बसून तेथून काढता पाय घेतला असता संशयितांनी भोसले यांच्या रिक्षाचा पाठलाग करीत निलगीरी बाग वळणावर रिक्षा अडवून घाडगे यांना मारहाण करीत त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या घटनेत घाडगे जखमी झाले असून अधिक तपास उपनिरीक्षक घोडे करीत आहेत.