नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रस्त्याने पायी जाणा-या एका कामगार महिलेचा पाठलाग करीत दुचाकीस्वाराने विनयभंग केल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील सिमेन्स कंपनी भागात घडली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडिता अंबड औद्योगीक वसाहतीतील एका कारखान्यात नोकरीस आहे. गेल्या दीड दोन महिन्यांपासून एमएच १५ जेई २२५८ या अॅक्टीव्हावर प्रवास करणारा अज्ञात इसम तिचा कामावर जातांना व येतांना पाठलाग करीत होता. गुरूवारी (दि.१७) नेहमी प्रमाणे महिला आपल्या कामावर जात असतांना सिमेन्स कंपनीजवळील आर.पी.स्विटस दुकानाजवळ पाठलाग करीत आलेल्या संशयिताने तिची वाट अडविली.
तुला पैसे देतो माझ्या गाडीवर बस असे म्हणत दुचाकीस्वाराने तिचा विनयभंग केला. संशयिताचा अतिरेक वाढल्याने पीडितेने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मुगले करीत आहेत. या घटनेने औद्योगीक वसाहतीत काम करणा-या महिलावर्गाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलीसांनी कंपन्या भरतांना व सुटतांना गस्त वाढवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.