नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जाण्या येण्यास अडथळा व्हावा या उद्देशाने टोळक्याने रातोरात कंपाऊंड उभारल्याचा प्रकार मखमलाबाद नाका भागात घडला. जेसीबीच्या सहाय्याने पत्र्याचे शेड पाडून हे कृत्य करण्यात आले असून शेडमधील साहित्य टोळक्याने चोरून नेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश भास्कर, रामदार भास्कर, कृष्णा भास्कर शंभु भास्कर, अनिल भंडारी, एमएच १५ केसी ९४५८ या जेसीबी वरील चालक व अन्य ५ ते ६ जण अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत संजय दत्तात्रेय थोरवे (राजपाल कॉलनी. हेमकुंज रोड मखमलाबादनाका ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. थोरवे लाकडी वखारीचे मालक असून त्यांच्या कब्जा वहिवाटीतील सर्व्हे नं. ९१ – ३ – २ या ठिकाणी हा प्रकार घडला.
या भूखंडावर जयभोलेनाथ बुडन बॉक्स नावाने त्यांनी पत्र्याचा शेड उभारलेला होता. संशयितांनी शनिवारी (दि.१२) पहाटेच्या सुमारास थोरवे यांच्या कब्जातील जागेत बळजबरीने घुसून पत्र्याचे शेड जेसीबीच्या सहाय्याने पाडून नुकसान केले. शेडमधील इलेक्ट्रीक मिटर,मोटार व दोन कटर मशिन, लोखंडी कपाट व पलंग तसेच पत्रे व अँगल संशयितांनी चोरून नेल्याचा आरोप करण्यात आला असून, या ठिकाणी मोठा खड्डा खोदून वहिवाटीवरील जागेत जाण्या येण्यासाठी प्रतिबंध व्हावा म्हणुन कंपाऊड उभारूण अडथळा निर्माण करण्यात आल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पंकज सोनवणे करीत आहेत.