नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अल्पवयीन शाळकरी मुलांनी मौजमजेसाठी एक दोन नव्हे तर तब्बल अकरा मोटारसायकली चोरल्या असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलांच्या ताब्यातून सर्व दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. हे मुले नंबर प्लेट काढून दिवसभर आलटून पालटून शहरात राईडींग करीत होते.
या घटनेबाबत म्हसरूळ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (दि.४) उपनिरीक्षक दिपक पटारे व अंमलदार प्रशांत देवरे पेठरोडवर पेट्रोलींग करीत असताना दुचाकीचोरट्यांची माहिती मिळाली. त्यानुसार पेठरोडवर सापळा लावला असता संशयित दोन अल्पवयीन मुले पोलीसांच्या हाती लागले. मेहरधामच्या दिशेने भरधाव डबलसिट जाणा-या दुचाकीस्वारास पोलीसांनी थाबण्याचा इशारा केला मात्र तो थांबला नाही. संशयित मुलाने आपली दुचाकी दामटल्याने पोलीसांनी पाठलाग करीत एसटी वर्कशॉप जवळ त्यांची वाट अडविली मोटारसायकलच्या कागदपत्रांबाबत चौकशीत दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पथकाने चेसी व इंजिन नंबरच्या आधारे खातरजमा करण्याचा प्रयत्न केला असता सदरची दुचाकी म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेल्याबाबत आढळून आले. पथकाने त्यांच्या पालकांना पाचारण करीत कसून चौकशी केली असता मोटारसायकल चोरीचा उलगडा झाला.
मौजमजेसाठी अन्य चार ते पाच साथीदारांच्या मदतीने आम्ही शहरातील वेगवेगळया भागातून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. तसेच नंबरप्लेट काढून टाकत मौजमजेसाठी आलटूनपालटून आपआपसात दुचाकी वापरल्याचे त्यांनी सांगितल्याने पोलीसांनी सर्व बालकांना विश्वासात घेवून त्यांच्या ताब्यातून अकरा मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. दिवसभर शहरात फिरण्यासाठी मोटारसायकलींचा वापर करून रात्री ती आडबाजूला लपवून पार्क करून ठेवली जात होती. संशयितांच्या चौकशी मुळे म्हसरूळचे चार,पंचवटी व उपनगर हद्दीतील प्रत्येकी दोन व भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल असलेला एक गुन्हा उघडकीस आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक अतुल डहाके, उपनिरीक्षक मनोहर क्षिरसागर,दिपक पटारे,हवालदार बाळासाहेब मुर्तडक,सतिष वसावे,देवराम चव्हाण,प्रशांत वालझाडे अंमलदार पंकज चव्हाण,गुणवंत गायकवाड,पंकज महाले,योगेश सस्कर,प्रशांत देवरे,जिंतेंद्र शिंदे,ज्ञानेश्वर कातकाडे व गिरीधर भुसारे आदींच्या पथकाने केली.