नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागात झालेल्या दोन घरफोडींमध्ये चोरट्यांनी सव्वा दोन लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे व लॅपटॉपटचा समावेश आहे. याप्रकरणी म्हसरूळ व अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या घरफोडी प्रकरणी नंदिनी लखन चव्हाण (रा. कस्तूरी गंध सोसा. वाढणे कॉलनी म्हसरूळ ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. चव्हाण कुटुंबिय सोमवारी (दि.१४) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली ४५ हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख ५७ हजाराचा ऐवज चोरून नेला. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पटारे करीत आहेत.
दुसरी घरफोडी सिडकोतील नेहरू चौकात झाली. याबाबत किरण रामचंद्र चव्हाण (रा.राजमाता जिजाऊ गार्डन शेजारी,नेहरू चौक ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. चव्हाण कुटुंबिय ११ ते १४ जुलै दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून किचनमधील अलमारीत ठेवलेली २५ हजाराची रोकड सोन्याचांदीचे दागिणे व मुलाचा लॅपटॉप असा सुमारे ५३ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार आवारे करीत आहेत.