नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- खूनाच्या गुह्यात गुंगारा देणारा योगेश राजेंद्र साळवी (३१ रा. वैष्णवरोड मालेगावस्टॅण्ड) अखेर पोलीसांच्या जाळयात अडकला. विमा रकमेसाठी भिका-याचा खून केल्याचा आरोप संशयितावर असून त्यास म्हसरूळ पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ पथकाने केली.
२०२२ मध्ये हा प्रकार उघडकीस आला होता. मृत अशोक भालेराव हे हयात असतांना त्यांच्या नावे काढलेल्या विम्याची रक्कम हडपण्यासाठी खून करण्यात आला होता. बेकायदेशीर मार्गाने पैसे उकळण्याचा नादात संशयित मंगेश सावकार, रजनी उके, दिपक भारूडकर, प्रणव साळवी, योगेश साळवी व मयत अशोक भालेराव आदींनी कटकारस्थान करून ही हत्या केली होती. भालेराव यांच्यासारख्या दिसणा-या भिका-याचा या घटनेत खून करण्यात आला होता. मोटार अपघात गुन्हयाच्या तपासात संशयितांच्या कृत्याचा उलगडा झाला होता. याप्रकरणी उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २८ डिसेंबर रोजी म्हसरूळ पोलीस ठाण्यात खूनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र संशयित गुन्हा दाखल होताच पसार झाला होता.
पोलीस त्याच्या मागावर असतांना युनिट १चे अंमलदार विलास चारोस्कर व नितीन जगताप यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. रविवारी (दि.१३) सायंकाळच्या सुमारास तो लोणार गल्लीजवळील फनिबाबा दर्गा भागात असल्याची माहिती मिळाल्याने पोलीसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. संशयिताने गुन्हयाची कबुली देत फरार काळात वेशांतर करून नर्मदा परिक्रमा, महाकुंभमेळा प्रयागराज व त्र्यंबकेश्वर आदी ठिकाणी वास्तव्य केल्याचे सांगितले असून त्यास म्हसरूळ पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई युनिटचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुदाम सांगळे,हवालदार रविंद्र आढाव,रोहिदास लिलके अंमलदार विलास चारोस्कर,नितीन जगताप,राम बर्डे,गोरख साबळे,राहूल पालखेडे,समाधान पवार व अनुजा येलवे आदींच्या पथकाने केली.