नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर व परिसरात घरफोडीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागात झालेल्या दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे तीन लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचादींच्या दागिन्यांचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड व उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
गोविंदनगर येथील मोनीष गोविंदराव देवरे (रा.वारियन स्पेस,गोविंदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार देवरे कुटुंबिय शनिवारी (दि.१२) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यानी त्यांचे बंद घराचे लॅचलॉक तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली दीड लाखाची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख ८३ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बागुल करीत आहेत.
दुसरी घरफोडी नाशिक पुणे मार्गावरील बोधलेनगर भागात झाली. याबाबत पुष्पा शामकांत अहिरे (रा.एनक्लेव्ह सोसा. मेट्रो मॉल मागे यशवंतनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अहिरे कुटुंबिय शुक्रवारी (दि.११) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेला सुमारे १ लाख २० हजार रूपये किमतीचा व ३० ग्रॅम वजनाचा राणी हार चोरून नेला. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार बकाल करीत आहेत.