नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्लॅस्टीक बंदी कारवाई दरम्यान महापालिका कर्मचा-यास बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार पखालरोड भागात घडला. या घटनेत कांदा बटाटा विक्री करणाºया पिकअप चालकासह साथीदारांनी जीवे मारण्याची धमकी देत मनपा कर्मचा-यास मारहाण केली असून, याबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार जाहिद वली मोहम्मद शेख (रा.पखालरोड) व त्याचे २ ते ३ साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत विजय प्रेमजी मारू (५६ रा.आरटीओ समोर पेठरोड) यांनी फिर्याद दिली आहे. मारू महापालिकेचे कर्मचारी असून ते गुरूवारी (दि.१०) पखालरोड भागात प्लॅस्टीक बंदीची कारवाई करीत होते.
सावित्री बाई फुले शाळा भाजी मार्केट भागात एक पिकअप चालक कांदे बटाटे ग्राहकांना प्लॅस्टीक पिशवीत देतांना आढळून आल्याने मारू यांनी जाब विचारला असता ही घटना घडली. संतप्त विक्रेत्याने आपल्या साथीदारांना बोलावून घेत वाद घातला. यावेळी शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत संशयित टोळक्याने मारू यांना बेदम मारहाण केल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक जितेंद्र वाघ करीत आहेत.